वन बुलडाणा मिशनच्या तरुणांची फौज घेऊन संदीप शेळके मदतकार्यासाठी जळगाव जामोद, संग्रामपूरात! नागरिकांच्या घरातील पाणी उपसले, गाळ काढला!

आज लागणार वैद्यकीय कॅम्प; संदीप शेळके म्हणाले,मन हेलावून टाकणारी परिस्थिती, शासनाने सर्वे करण्यात वेळ घालवल्यापेक्षा तात्काळ मदत पोहचवावी
 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात काल,२२ जुलैला कोसळधार पाऊस पडला. जून महिन्यात तरसायला लावणारा पाऊल आता एवढा कोसळला की जस काही आभाळच फाटलय..दोन्ही तालुक्यात या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक गावांतील शेकडो घरात पुराचे पाणी शिरले, काहींचे धान्य, कपडे, सिलिंडर देखील वाहून गेल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आमच्या आमच्या हयातीत एवढा पाऊस पाहिला नाही अश्या प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके वन बुलडाणा मिशनच्या तरुणांची फौज घेऊन कालच पुरग्रस्त भागात पोहचले आहेत. रात्रीपासूनच वन बुलडाणा मिशनने मदतकार्याला सुरुवात केली असून अनेक घरांतील पाणी उपसने, गाळ काढणे, पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था तसेच आवश्यक ती मदत केल्या जात आहे.
इथली परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. पुराचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसले आहे. घरातील कपडे, अन्नधान्य, गॅस सिलिंडर वाहून गेले आहे. स्वयंपाकाचे कुठलेच साधन अनेक घरात आता शिल्लक नाही. शेती खरडून गेली आहे. अशा परिस्थितीत राजर्षी शाहू परिवार, राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन, वन बुलडाणा मिशन पूरग्रस्त नागरिकांच्या सोबत आहे. माझे सहकारी नागरिकांना मदत करण्यासाठी झटत आहेत असे संदीप शेळके म्हणाले. शिवाय आणखी सहकाऱ्यांनी मदतकार्यासाठी येण्याचे आवाहन देखील संदीप शेळके यांनी केले आहे.
  कुठेच कमी पडू देणार नाही,संदीप शेळकेंचा संकटात सापडलेल्या नागरिकांना शब्द..
 महापुरामुळे ज्येष्ठांचे, लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. घरातील पुस्तके,कपडे वाहून गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू परिवार व वन बुलडाणा मिशनने पाऊले उचलली आहेत. अशा नैसर्गिक संकटामुळे रोगराई पसरण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे आजपासूनच वैद्यकीय कॅम्प लावण्यात येणार असून वन बुलडाणा मिशन च्या तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी उपलब्ध राहील. " आपण एकाच कुटुंबाचे घटक आहोत, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत, मात्र खचून न जाता या दुःखातून आता आपल्याला नवी उभारी घ्यायची आहे, राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलडाणा मिशन आपल्याला कुठेच कमी पडू देणार नाही.." असा शब्द संदीप शेळके यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिला.
सर्वे करण्यात वेळ घालवू नका..!
 
अतिवृष्टीने जे नुकसान झालेय ते मन हेलावून टाकणारे, काळीज पिळवटून टाकणारे आहेत. उघड्या डोळ्यांने हे नुकसान दिसत आहे, त्यामुळे सर्वे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तात्काळ मदत कशी पोहचवता येईल याचा विचार प्रशासकीय यंत्रणेने करावा. शासकीय पंचनामे होऊन मदत कशी मिळते याचा वाईट अनुभव लोकांना आहे, ती मदत यायला उशीर होईल, तोपर्यंत नागरिकांना वाऱ्यावर सोडता का असा सवाल संदीप शेळके यांनी प्रशासकीय यंत्रणेला केला. जिल्हा पोलिस अधिक्षकांशी फोनवरून संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी केली.