गावात मान पण घरात अपमान! ग्रामपंचायत सदस्य असलेल्या लेकीचा छळ मांडला! पैशासाठी घरातून बाहेर काढले! नांदुऱ्याच्या दिपालीने सांगितली आपबिती...
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गावात तिला मानसन्मान मिळायचा मात्र घरातल्यांनी तिचा प्रचंड छळ केला, ग्रामपंचायत सदस्य म्हणून ती चांगल्या मतांनी निवडून आली होती. मात्र तिच्या नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला तिच्याकडून केवळ पैसे पाहिजे होते. माहेरवरून मोटारसायकल घ्यायला १ लाख रुपये आण असा तगादा तिच्याभोवती लावण्यात आला, त्यासाठी तिचा प्रचंड शारीरिक मानसिक छळ करण्यात आले. चक्क घराबाहेर देखील काढून दिले..अखेर वैतागून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह सासू , सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कहाणी आहे, नांदुऱ्याची लेक असलेल्या दिपाली सुनील बोडदे (२७) हीची..
दिपालीचे सासर आहे जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील सोनोटी. दिपालीचे लग्न २०१५ मध्ये सुनील बोडदे याच्याशी झाले. लग्नानंतर जवळपास ३ वर्षे तिला चांगले वागवले मात्र त्यानंतर छळ सुरू झाला. नवरा, नणंद, सासू ,सासरे तिला विविध कारणांवरून त्रास देत होते असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
मोटारसायकल घेण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून १ लाख रुपये आण असा तगादा तिच्याभोवती लावण्यात आला. आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बरी नाही त्यामुळे पैसे देऊ शकत नाही असे तिने सांगितले त्यावेळी तिला बेदम मारहाण करण्यात आली. पैसे आणले तर वागविन असे म्हणून तिला १५ मे २०२३ ला घराबाहेर काढले. तेव्हापासून दिपाली माहेरी आहे, सगळ्या पाहुण्यांनी, नातेवाईकांनी मध्यस्थी करून बघितली मात्र तिच्या सासरच्या लोकांवर कोणताही परिणाम झाला आहे. अखेर नांदुरा पोलिसांसमोर तिने तिची आपबिती कथन केली. पोलिसांनी दिपालीचा नवरा, सासू, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.