भाड्याने घर देताय..? खामगावची "ही" घटना वाचून चार वेळेस विचार कराल...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बातमीचे शीर्षक वाचून नेमकी काय भानगड आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेलच..अर्थात ते स्वाभाविक आहे.. पण खामगाव मध्ये एका भाडेकरुने असा प्रताप केलाय जो वाचून तुम्ही तुमचे घर भाड्याने देतांना चार वेळेस नक्की विचार कराल... खामगावचे हे मॅटर चक्क पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे..

घटना खामगावच्या पोस्ट ऑफिस जवळील आहे. निळकंठ सदाशिव शास्त्री (८१) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. निळकंठ शास्त्री यांना एक मुलगा असून तो नोकरीसाठी अमेरिकेत राहतो. ते आणि त्यांची पत्नी असे दोघेच त्यांच्या खामगाव च्या घरात राहतात. घराचा एक भाग त्यांनी भाडेकरू म्हणून तीन वर्षांपासून नितीन अर्जुन हिरळकर (३६) याला दिला होता. तो मुलाबाळांसह त्या घरात राहत होता. 

तक्रारीनुसार नितीन ने मागील महिन्याचे घर भाडे भरले नव्हते. याशिवाय दोन महिन्याचे इलेक्ट्रिक बिल देखील भरलेले नव्हते. निळकंठ शास्त्री सातत्याने घर भाडे आणि इलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी सांगत होते ,मात्र नितीन कडून कोणताही प्रतिसाद नव्हता. 

दरम्यान एके दिवशी निळकंठ शास्त्री कामासाठी बुलढाण्याला आले होते. संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना नितीन घर खाली करून गेल्याचे कळले. घराची तपासणी केली असता शास्त्री यांनी घरात केलेली इलेक्ट्रिक फिटिंग, पंखे, मोटार चे पाईप, लोखंडी बंगई  असे सगळे साहित्य देखील नितीन घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.. नितीन ने घर भाडे तर दिलेच नाही उलट घरात लावलेले साहित्य देखील घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. निळकंठ शास्त्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.