शेगावातील मंडळ अधिकारी कार्यालयात राडा! अधिकारी पैशासाठी नागरिकांना त्रास देत असल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप...

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तसेच तलाठी कार्यालयातून प्रकरणाची शिफारस पाठवल्यानंतरही अधिकारी निव्वळ पैशासाठी नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप करत काल २२ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी शेगावातील मंडळ अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा नेत धडक दिली. यावेळी अधिकारी हजर नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बाकड्यांची फेक - फाक करत राडा केला. 
जमिनीच्या नोंदी विषयीचे प्रकरण तलाठी स्तरावर मंजूर झालेले असताना मंडळ अधिकारी पुढील प्रक्रियेसाठी लाच मागतात अशी तक्रार काही नागरिकांनी मनसेच्या शेगाव येथील पदाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी विचारणा केली असता दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शेवटी तक्रारी वाढत चालल्याने मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंडळ अधिकारी कार्यालयाला धडक दिली. मात्र अधिकारी हजर नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली, बाहेरील बाकड्यांची फेक फाक केली. पुढे कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळवला. त्या ठिकाणीही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ पुरी यांना संपूर्ण प्रकरण, घटना सांगण्यात आली. वेळीच त्यांनी मंजूर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लगेचच तात्काळ नायब तहसीलदारांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले.