"श्रीं"च्या खामगाव –शेगाव ‘वारी’त प्रतापराव जाधवांचा सेवाधर्म! लाखो वारकऱ्यांसाठी लासुरा फाट्यावर उभारला आरोग्यसेवेचा ‘आधारवड’! 

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी प्रवास करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे विशेष वैद्यकीय सेवा व मदत कक्ष उभारण्यात आला. ‘आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून उभारलेल्या या कक्षाच्या माध्यमातून वारीत सहभागी झालेल्या भाविकांना वैद्यकीय उपचार, औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

प्रतापराव जाधवांच्या संकल्पनेला सेवाभावी रूप

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण केल्यानंतर संत गजानन महाराजांची पालखी १९ ऑगस्ट रोजी सकाळी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. तब्बल ६० दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी परतीच्या मार्गावर असताना बुलडाणा जिल्ह्यातील लाखो वारकरी खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास करत होते.

वारीतील भाविकांना प्रवासादरम्यान तातडीची आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे विशेष आरोग्य कक्षाची उभारणी करण्यात आली.या उपक्रमातून केवळ वैद्यकीय उपचार नव्हे, तर वारीतील भक्तांच्या सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाडी परीक्षणापासून रुग्णवाहिकेपर्यंत सुविधा

यंदाच्या आरोग्य कक्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाडी परीक्षणाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तज्ज्ञांच्या चमूने नाडी परीक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या प्रकृतीविषयी प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य कक्षात दोन रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि पुरेसा औषधसाठा सज्ज ठेवण्यात आला होता. त्यामुळे पायी प्रवासादरम्यान त्रास झालेल्या वारकऱ्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली.

ऋषी जाधवांची प्रत्यक्ष उपस्थिती; वारकऱ्यांचे स्वागत

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांनी आरोग्य कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सेवेत सहभाग घेतला. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या भाविकांचे स्वागत करून त्यांना अभिवादन केले तसेच संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

‘आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा उपक्रम श्रींच्या चरणी अर्पण असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.सुमारे ६० दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून संत गजानन महाराजांची पालखी १९ ऑगस्ट रोजी संतनगरी शेगावमध्ये दाखल झाली. पालखीसोबत लाखो भाविकांनी पायी चालत वारीचा आनंद घेतला. या भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लासुरा फाट्यावर उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षामुळे वारीदरम्यान अनेकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध झाली.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.