ई-पीक पाहणी अॅपचा भोंगळ कारभार! लोकेशन दाखवतंय भलतीकडेच; पेडकातील शेतकरी पीक विमा, अनुदानापासून वंचित राहण्याच्या भीतीत

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ई-पीक पाहणी अॅपमध्ये शेतजमिनींचे लोकेशन चुकीच्या ठिकाणी दाखवले जात असल्याने खामगाव तालुक्यातील पेडका येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ई-पीक पाहणीची नोंदच झाली नाही, तर पीक विमा, अनुदान आणि नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह खरीप पिके करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटाच्या काळात शासनाच्या ‘DCS MH ई-पीक पाहणी’ अॅपमधील तांत्रिक त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पेडका येथील शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन देत समस्या मांडली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्याभरापासून ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरू असतानाही पेडका गावातील शेतजमिनींच्या गट क्रमांक आणि सर्व्हे नंबरचे लोकेशन अॅपमध्ये चुकीच्या ठिकाणी दाखवले जात आहे. त्यामुळे संबंधित शेतात प्रत्यक्ष उभे राहून ई-पीक पाहणीची नोंद करणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ई-पीक पाहणीची नोंद झाली नाही, तर भविष्यात शासनाकडून मिळणारे अनुदान, पीक नुकसानभरपाई तसेच पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतात, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे पेडका येथील शेतजमिनींच्या गट क्रमांकांचे चुकीचे दाखवले जाणारे लोकेशन तात्काळ दुरुस्त करून ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी खामगाव तहसील कार्यालयाकडे केली आहे.