रक्षा विसर्जन नाही, वृक्षारोपण! मुलाने वडिलांना दिली पर्यावरणपूरक श्रद्धांजली..!
Advt 👆
गवंढाळा येथील प्रतिष्ठित नागरिक स्व. कैलास पंढरीनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गावातच अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कारानंतर नेहमीप्रमाणे रक्षा विसर्जनाची वेळ आली, तेव्हा कुटुंबियांनी ठाम निर्णय घेतला "बाबांची रक्षा कुठेही दूर न्यायची नाही, ती आमच्याच शेतात राहील आणि त्यावर त्यांच्या नावाचा आंबा फुलणार!" आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर कुटुंबियांनी वडिलांच्या राखेवर आम्रवृक्षाचे रोपटे लावले. डोळ्यात पाणी आणि मनात अभिमान घेऊन या रोपट्याला पाणी घालण्यात आले.
यापुढे हा आंबा वाढेल, त्याला मोहर येईल, फळे येतील आणि प्रत्येक आंब्यात वडिलांचा आशीर्वाद असेल, अशी भावना मुलांनी व्यक्त केली. वडील देहाने गेले असले तरी आंब्याच्या रूपाने ते कायम आपल्यातच राहतील, हा विचारच सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. रक्षा विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही या कुटुंबाने दिला आहे. एक रोपटं म्हणजे एक आयुष्य हे खऱ्या अर्थाने येथे सिद्ध झाले. या भावनिक क्षणी मुलगा अमोल कैलास पाटील, गणेश कैलास पाटील, मुलगी सौ. प्रगती अमोल पाटील (पहूर), सौ. अर्चना श्रीकृष्ण चौधरी, गायत्री अमोल पाटील, अवनी चौधरी आदी कुटुंबीय उपस्थित होते.