नाव कृष्णा, कृत्य मात्र संतापजनक! दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला त्रास दिल्याची तक्रार; तिघांवरही धमकावल्याचा आरोप
तक्रारीत नमूद केल्यानुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, शाळेत ये-जा करताना पेंडका पातोंडा येथील कृष्णा विलास महारखेडे हा तिचा पाठलाग करत असल्याचे तिने आईला सांगितले. तसेच मोबाईलद्वारे संदेश पाठवण्याचाही प्रकार होत असल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. याबाबत विद्यार्थिनीने संबंधित तरुणाला समजावून सांगण्याची विनंती केली होती.
समजावून सांगितल्यानंतरही वाद?
तक्रारीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यार्थिनीच्या आईने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने कृष्णा विलास महारखेडे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे आणि त्यानंतर इतर आरोपींनीही वाद घालण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
शाळेत जाताना पुन्हा अडविल्याची तक्रार
तक्रारीत पुढे नमूद केल्यानुसार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनी शाळेत जात असताना कृष्णा विलास महारखेडे याने तिला मागून येऊन हात पकडत जवळ ओढल्याचा आरोप आहे. तसेच याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास काहीही बिघडणार नसल्याचे सांगून धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर रुपेश कैलास महारखेडे, गौरव सुभाष महारखेडे आणि विलास शिवलाल महारखेडे हेही घटनास्थळी आल्याचे आणि त्यांनीही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईने खामगाव ग्रामीण पोलिसांकडे तक्रार देऊन संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच आपल्या अल्पवयीन मुलीला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.