खामगावात शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास; CCTVच्या धाग्याने पोलिसांनी आरोपीला जळगावातून उचलले!
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; चोरीचा १६ ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी शिक्षिका स्वप्ना प्रविण तेलकर (वय ४७) या खामगाव शहरातील एका ठिकाणाहून जात असताना दुपारी सुमारे १.१० वाजता त्या घराजवळ पोहोचल्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येत दुचाकीवरून त्यांचे लक्ष विचलित केले. याच दरम्यान त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, तत्कालीन किंमत सुमारे ५० हजार रुपये, जबरदस्तीने हिसकावून दोघेही पसार झाले होते.याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६, कलम ३०४(३)(५) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CCTV फुटेज ठरले महत्त्वाचा दुवा!
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार पथकाने घटनास्थळासह परिसरातील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्यात आली.तपासादरम्यान भूषण बाळू पाटील (वय २२, रा. अशोकनगर, शिरसाळी, ता. जि. जळगाव) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने जळगाव येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
चोरीचा ऐवजही हस्तगत
पोलिसी चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून १६.०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे २ लाख १९ हजार रुपये बाजारभावाचे, हस्तगत करण्यात आले आहे.आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात ८ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासकौशल्याचे कौतुक
भरदिवसा शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर करत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा ऐवजही हस्तगत केला. या जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे खामगाव शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या तपास यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकराव, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.