लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवले!; मित्राने केली मदत, खामगाव तालुक्‍यातील घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची खळबळजनक घटना खामगाव तालुक्‍यातील पेडका पातोंडा (ता. खामगाव) येथे काल, २९ जानेवारीला पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) समोर आली. पळवून नेणारा तरुण आणि त्‍याला मदत करणारा साथीदार या दोघांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी आज, ३० जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात ४० वर्षीय वडिलांनी तक्रार दिली. विकास झांगो तायडे (२३), महिंद्रा बाबुराव गवई (दोघे रा. पातोंडा) अशी संशयितांची नावे आहेत. विकास मध्यरात्री घरात घुसला. त्‍याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून घरातून बाहेर आणत मोटारसायकलवर बसवले. याकामी त्‍याला त्याचा मित्र महिंद्राने मदत केली. ही बाब मुलीच्या भावाने बघितली आणि अडवले असता त्‍याला ढकलून विकास मुलीला घेऊन पसार झाला. तपास सहायक पोलीस निरिक्षक द्वारकानाथ गोंदके करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संशयिताचे गावात मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. तो सीमकार्डही विकायचा. यातूनच त्‍याची ओळख मुलीशी झाल्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.