खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमध्ये समावेश; रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी उच्चस्तरीय संयुक्त बैठक घेण्याची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी...
खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या पुढील प्रक्रियेला अधिक गती मिळावी, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागातील उच्चस्तरीय अधिकारी आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनची सुरुवात १३ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली. देशातील विविध पायाभूत सुविधा आणि बहुविध वाहतूक साधनांना एकात्मिक पद्धतीने चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मास्टर प्लॅनमध्ये खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा समावेश झाल्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. तसेच मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे मार्गांना जोडण्याच्या दृष्टीनेही या रेल्वे मार्गाचे महत्त्व आहे. विद्यमान रेल्वे मार्गांमधील अंतर कमी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार असून, या भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा, जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आणि शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ यांसारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. खामगाव-जालना रेल्वे मार्गामुळे या पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या वाहतूक सुविधांना चालना मिळण्यासोबतच व्यापार, पर्यटन, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या कामालाही गती देण्याची मागणी
अकोला-खंडवा रेल्वे मार्गांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांतून नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने त्यालाही आवश्यक गती देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.
खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानंतरच्या कामांना अधिक गतिशीलता मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा केवळ विकासाचा प्रकल्प नसून बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या अपेक्षेशी आणि लोकभावनेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी केंद्र व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न करण्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी मांडली.