अवैध रेती माफियांना जलंबचे शेतकरी वैतागले! तहसीलदारांना, आमदारांना निवेदन दिले; साहेब सांगा, सोयाबीन कसे घरी आणु? 

 
 जलंब(संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जलंब येथील शेतकरी अवैध रेती माफी यांना वैतागले आहेत. रेतीमाफी यामुळे शेत रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. बैलगाडी सोडा, ट्रॅक्टर सोडा रस्त्याने पायी चालणे देखील कठीण आहे, त्यामुळे सोयाबीनचा घास तोंडाशी आलेला असताना सोयाबीन काढल्यानंतर घरी आणायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे या संबंधातील निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना व आमदारांना दिले आहे.

जलंब गावा शेजारच्या नाल्यांमधून रेतीचा मोठा उपसा सुरू आहे. रात्रीच्या वेळी हा उपसा केल्या जातो, ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक होते. ट्रॅक्टर मुळे रस्त्यात खूप मोठे खड्डे पडलेले आहेत, बैलगाडी देखील या रस्त्याने नेता येत नाही. त्यामुळे सोयाबीनची काढणी तोंडावर आलेली असताना सोयाबीन घरी आणावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार आकाश फुंडकर यांच्यासह तहसीलदारांची भेट घेतली. महसूल विभागाने अवैध रेती वाहतूक बंद करावी, अन्यथा आमरण उपोषणाला बसतील असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.👇

निवेदनावर शेतकरी संजय अवचार, चंद्रशेखर देशमुख, गोपाल मोहे, गजानन मोहे, बंडू सोनटक्के, महादेव तायडे, शरद मोहे, गणेश असंबे,पंजाबराव देशमुख, अनंता नरवाडे, मोहन दुटे,श्रीराम काळे, संतोष धामणकर यांच्यासह जवळपास दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.