नदीपात्रात बुडून इसमाचा मृत्यू; शेगाव शहरात खळबळ
नगर परिषद सौंदर्यीकरण तलावात आढळला २१ वर्षीय युवकाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव शहरातील दुसरा नगर परिसरातील तीन पुतळे परिसरात नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
मृत युवकाचे नाव मोहम्मद अतहर मोहम्मद शहजाद (वय २१, रा. ईदगाह प्लॉट, शेगाव) असे आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता डायल ११२ वर दुसरा नगर परिसरातील एका युवकाचा विहिरीत/तलावात पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


घटनास्थळी नागरिक व नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला असता संबंधित युवकाचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय, शेगाव येथे पाठविण्यात आला.


या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस नाईक निलेश गाडगे करीत आहेत.
या युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.