मलकापुरात बायोडिझलची अवैध निर्मिती!
कंपनीवर छापा; ६० हजार लिटर बनावट बायोडिझल जप्त
Dec 24, 2021, 21:47 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायोडिझेलची अवैधरित्या निर्मिती करणाऱ्या कंपनीवर छापा मारून ६० हजार लिटर केमिकलयुक्त बायोडिझेल जप्त करण्यात आले. आज, २४ डिसेंबरला पहाटे दीडच्या सुमारास (मध्यरात्री) मलकापुरातील दसरखेड एमआयडीसी परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांनी ही कारवाई केली.
दसरखेड परिसरात केमिकलचा उपयोग करून बायोडिझलची निर्मिती होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांचे पथक, तहसीलचे पथक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री दीडच्या सुमारास दसरखेड एमआयडीसीतील कंपनीत छापा मारला. त्यावेळी बायोडिझेलच्या नावावर तयार करण्यात आलेले ६० हजार लिटर केमिकलयुक्त डिझेल जप्त करण्यात आले. एकूण साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, केमिकलयुक्त डिझेलचे नमुने पेट्रोलियम लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. चौकशीअंती या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी करीत आहेत.