मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; २ जण ठार, १ गंभीर

खामगाव तालुक्यातील घटना
 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज, ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चिखली- खामगाव रस्त्यावरील हिवरखेड फाट्याजवळील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाजवळ हा अपघात झाला.


पाळा (ता. खामगाव) येथील काशीराम किसन चांदणे (५०), गोपाल नारायण पुंड (३५) व कैलास भास्कर  गाढवे (४५) हे तिघे दुचाकीने खामगाववरून त्यांच्या गावाकडे जात होते. दरम्यान हिवरखेड फाट्याजवळ खामगावकडून येणाऱ्या भरधाव पिकअपने दुचाकीला जबर धडक दिली. यात गंभीर जखमी कांशीराम चांदणे यांना उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू  झाला. गोपाळ पुंड व कैलास गाढवे या दोघा गंभीर जखमींना खामगावनंतर अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे उपचारासाठी नेत असताना कैलास गाढवे यांचाही मृत्यू झाला. गोपाळ पुंड यांच्यावर अकोल्यात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले. वृत्त लिहीपर्यंत हिवरखेड पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू होती.

मेहकर फाट्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आज, ९ डिसेंबर रोजी चिखली शहराजवळील मेहकर फाट्याजवळ ही घटना घडली. शेख शब्बीर शेख यासीन (४५, रा. पेनटाकळी, ता. मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शेख शब्बीर हे चिखलीवरून पेनटाकळीकडे जात होते. त्याचवेळी मेहकर फाट्याजवळ मागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात शेख शब्बीर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.