जळगाव जामोद संग्रामपूरात पावसामुळे हाहाकार! गावागावात पुराचे पाणी घुसले; १५० पेक्षा अधिक नागरिक अडकले! वीजपुरवठा खंडित!

खेर्डीच्या शेतकऱ्याचा "बुलडाणा लाइव्ह" ला फोन;म्हणे भाऊ, भिंत खचली,२५ क्विंटल सोयाबीन गेलं वाहून...

 
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात कोसळधार पाऊस सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव येथे पुराचे पाणी गावात घुसल्याने १५० पेक्षा अधिक नागरिक अडकल्याचे वृत्त आहे.
 

 

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डी येथील शेतकरी ओमप्रकाश देवानंद झंवर यांचे नदीच्या काठावर असलेले घर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे त्यांनी बुलडाणा लाइव्ह ला या फोन करून सांगितले. घरात असलेली २५ क्विंटल सोयाबीन, टिनपत्रे देखील वाहून गेली असल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

दरम्यान काल रात्रीपासून सुरू असल्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले आहे. जवळपास सर्वच नदी नाल्यांना पुर आला आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. शेगाव वरवट रस्त्यावरील कालखेडच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तो रस्ता देखील बंद आहे.

रात्रीपासून वीज गायब, फोनही लागत नाही..

दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश गावातील वीजपुरवठा काल रात्रीपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे मोबाईल चार्ज नसल्याने फोनही लागत नाही. त्यामुळे नेमके काय करावे याबाबत स्थानिक नागरिक गोंधळून गेले आहेत. जिल्हा प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम संग्रामपूर तालुक्यात पोहचली आहे.