संडासला जातो सांगून गेला आणि थेट विहिरीत सापडला मृतदेह! शेगावच्या १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूचे गुढ काय, हत्या की आत्महत्या? 

 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विहिरीत बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल २५ जून रोजी शेगाव तालुक्यातील सवर्णा गावात घडली. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

  अजित संजय इंगळे असे मृतक तरुणाचे नाव आहे. २५ जूनच्या सकाळी संडासला जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. बराच वेळ निघून गेल्यानंतर देखील तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शोधले. खूप शोधून सुद्धा मिळाला नसल्याने त्याचे कुटुंबीय शेगावात पोहोचले. त्याठिकाणी त्याचा शोध सुरू झाला. त्यानंतर अजितच्या काकांना गावातून फोन आला, अजित हा गावातील विहिरीत पडला असावा म्हणून गावातील लोकांनी विहिरीची पाहणी केली. त्यामध्ये मानव जातीचे प्रेत आढळल्याचे समजले. बाहेर काढल्यानंतर अजित याचे असल्याचे कळाले. ही बाब शेगाव पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी अजितचा मृतदेह तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या घटनेमुळे, संपूर्ण सवर्णा गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. अजित विहिरीमध्ये कसा पडला? अजितच्या मृत्यूचे कारण काय? याचे गुढ पुढील तपासातून बाहेर येणार आहे. शेगाव पोलीस तपास करीत आहेत.