शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे पैसे घेतले अन्‌ बनावट पावत्या दिल्या

जळगाव जामोदच्या सीएससी सेंटरवाल्याचा प्रताप!; गुन्हा दाखल
 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पीकविमा भरलेल्या अनेक शेतकऱ्यांचा विमा मंजूर होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळाली. मात्र काही शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही. त्यांनी कारणांचा शोध घेतला असता ज्या सीएससी सेंटरवरून त्यांनी विमा भरला त्या सीएससी सेंटरचालकाने पैसे घेऊन बनावट पावत्या दिल्याचे समोर आले. त्यामुळे शेतकऱ्याने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीअंती खांडवी (ता. जळगाव जामोद) येथील आपले सरकार सेवा केंद्राचा संचालक मनोहर हरिभाऊ बावस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील शेतकरी प्रवीण सुभाषराव देशमुख यांनी २०२० च्या खरीप हंगामासाठी त्यांच्या शेतातील पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता. विम्याची १६०२ रुपये रक्कम त्यांनी खांडवी येथील आपले सरकार सेवा केंद्र चालविणाऱ्या मनोहर हरीभाऊ बावस्कर यांच्याकडे भरली होती. बावस्कर याने पैसे भरल्याची पावती दिली.

मात्र पैसे पीक विमा कंपनीकडे पाठवले नाही. यंदा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. मात्र देशमुख यांना पीक विमा मिळाला नाही. देशमुख यांच्या १ हेक्टर ७८ आर शेत जमिनीचा त्यांना ८० हजार १०० रुपये विमा मिळाला असता. मात्र बावस्कर याने बनावट पावती दिल्याने देशमुख यांना विमा मिळाला नाही. देशमुख यांच्यासोबत टाकळी पारस्कर येथील वनमाला हरिभाऊ चांभारे, कैलास मुरलीधर चांभारे, वासुदेव जगदेव पारस्कार, लक्ष्मीबाई जगदेव पारस्कार, केदारनाथ पारस्कार, गाडेगाव बुद्रूकचे संदीप इटखेडे यांचेही पैसे घेऊन बारस्कार याने बनावट पावत्या दिल्या व पैसे विमा कंपनीला न पाठविल्याने शेतकऱ्यांना विमा न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली, अशी तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात देण्यात आली. तक्रारीवरून बावस्करविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.