पुण्यावरून शेगावला येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! स्लीपर बस सेवा सुरू; असे आहेत तिकिटाचे दर...

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संत नगरी शेगावात दर्शनासाठी विविध ठिकाणांवरून भाविक येत असतात. पुण्यावरून शेगावला येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठी आहे. हेच हेरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुणे ते शेगाव स्लीपर बस सेवा सुरू केली आहे.
                    जाहिरात 
आज,६ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजता पुणे शेगाव पहिली स्लीपर बस शेगाव बस स्थानकावर पोहचली. काल मंगळवारच्या रात्री शिवाजीनगर बस स्थानकातून ही बस शेगावसाठी रवाना झाली होती. आता दररोज रात्री ९ वाजता पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकातून स्लीपर बस शेगावसाठी सुटणार आहे. शिवाय शेगाववरून दररोज रात्री ९ वाजता बस पुण्यासाठी सुटेल.
   एसटी महामंडळाकडून स्लीपर बसेस बनवण्यावर भर देण्यात येत आहे. लांबच्या प्रवासाला या बस वापरण्यात येणार आहेत. पुण्याच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत या बस बनवण्यात येत आहेत. पुणे ते शेगाव या प्रवासासाठी या बसचे एका प्रवाशासाठी तिकीट दर ९९० रुपये इतके असणार आहेत. या बसला महामंडळाच्या सर्व सवलती लागू असतील. तसेच www.msrtc.gov.इन या वेबसाईटवर बसचे आरक्षण करता येणार आहे. या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.