भल्या पहाटे हे पाव्हणं आलं कुठून?
Dec 23, 2021, 10:03 IST
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भल्या पहाटे अंगात जॅकेट घातलेला एका युवक डोलारखेडमध्ये (ता. शेगाव) आला... तो कोण, कुणाकडे आला... याची कुजबूज सुरू झाली... पण पाव्हणा नुसताच इकडेतिकडे रेंगाळू लागल्याने ग्रामस्थांनाही संशय आला. त्यांनी त्याला विचारणा केली. पण पाव्हणा काही बोलेना...
तो गतिमंद असल्याचे दिसत असून, केवळ अकोट एवढेच उच्चारतो. बाकी त्याला त्याचे नाव, पत्ता काही सांगता येईना... ग्रामस्थांनी जलंब पोलिसांना कळवले आहे. सध्या हा अनाहूत पाहुणा गावातील हनुमान मंदिरासमोर बसलेला आहे. गावकऱ्यांनी दया येऊन त्याला चहापाणी केला आहे. गावात असं कुणी हरवून आलं तर गावकरी जेऊ घालतात, मायेने विचारपूस करतात... ग्रामस्थांनी या पाहुण्याची माहिती बुलडाणा लाइव्हला कळवली. त्याचे कुणी नातेवाइक असतील, ओळखीचे असतील तर त्यांनी डोलारखेडला येऊन घेऊन जावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.