गण गण गणात बोते...! श्रींच्या पालखीचे २३ जुलैला बुलडाणा जिल्ह्यात आगमन – ३१ जुलैला शेगाव आगमन!

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आता परतीच्या मार्गावर असून २३ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. खामगाव ते शेगाव पायदळ वारीच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा देत हजारो वारकरी श्रींच्या जयघोषात सहभागी होणार आहेत.
यावर्षी पालखी सोहळ्याचे हे ५६ वे वर्ष असून, २ जून रोजी शेगाव येथून श्रींची पालखी ७०० पेक्षा अधिक वारकऱ्यांसह पंढरपूरकडे रवाना झाली होती. ४ जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाली आणि ६ जुलैला आषाढी एकादशी साजरी करून १० जुलैपासून परतीच्या पायी प्रवासाला सुरुवात झाली हाेती. 
१३०० किमीचा पायी प्रवास 
शेगाव ते पंढरपूर आणि परत असा सुमारे १३०० किमीचा संपूर्ण पायी प्रवास वारकरी मंडळी सश्रद्धतेने पार पाडत आहेत. पंढरपूरहून शेगावकडे येणाऱ्या मार्गावर विविध गावांमध्ये पालखीचे स्वागत, पूजन, दर्शन सोहळे यांचे आयोजन होत आहे.
सिंदखेडराजा येथून जिल्ह्यात हाेणार प्रवेश 
श्रींच्या पालखीचे २३ जुलै राेजी सिंदखेड राजा शहरात आगम हाेणार आहे. त्यानंतर पालखी २४ जुलै राेजी बिबी, २५ जुलै राेजी लोणार, २६ जुलै राेजी मेहकर, २७ जुलै राेजी जानेफळ, २८ जुलै राेजी शिर्ला नेमाणे, २९ जुलै राेजी आवार आणि ३० जुलै राेजी खामगाव येथे पालखीचे आगमण हाेणार आहे. ३१ जुलै राेजी श्री क्षेत्र शेगाव येथे पालखी पाेहचणार आहे. 
खामगाव–शेगाव वारी – लाखोंच्या पावलांचा उत्सव
पालखी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचल्यानंतर खामगाव ते शेगाव या अखेरच्या टप्प्यावर लाखो भाविक पायदळ वारीत सहभागी होतात. "गण गण गणात बोते...", "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला..." च्या जयघोषात संपूर्ण मार्ग भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतो. भक्तांची निष्ठा, टाळ-मृदंगाचा नाद आणि विठ्ठलनामाचा गजर संपूर्ण परिसर भारावून टाकतो.