एमआयडीसीतील पुठ्ठा कारखान्याला भीषण आग; कामगार मंत्री आकाश फुंडकरांची घटनास्थळी भेट...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एमआयडीसी परिसरातील पुठ्ठा निर्मिती करणाऱ्या कारखान्याला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. खामगाव एमआयडीसी येथील होरायझन पेपर पॅक प्रा. लि. या कंपनीत ७ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे १.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारखान्याला वेढा दिला. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साठवलेला कागदी पुठ्ठा असल्याने आगीचा वेग प्रचंड वाढला.
आगीची माहिती मिळताच परिसरातील कारखानदारांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तातडीने खामगाव अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात आणण्यासाठी शेगाव, जळगाव जामोद, मलकापूर व बुलढाणा येथील नगरपरिषदांच्या अग्निशमन दलांचीही मदत घेण्यात आली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करून अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यासाठी सुमारे ८० टँकर पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.
या भीषण आगीत कारखान्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.