पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला; शेगाव पोलिसात गुन्हा दाखल!
Jun 27, 2025, 08:59 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील पाळोदी शिवारातील एका शेतकऱ्याची बैलजोडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पेरणीचा हंगाम सुरू असतानाच ही घटना घडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
उमेश बुध्दीवान फुलकर या शेतकऱ्याच्या गट क्रमांक ४८९ मधील शेतामध्ये जनावरे बांधण्यासाठी टिनाचा गोठा उभारलेला होता. मात्र, पावसामुळे गोठा पडल्याने मागील चार दिवसांपासून त्यांनी बैलजोडी शेतात मोकळ्या जागेत बांधून ठेवली होती.
नेहमीप्रमाणे २४ जून रोजी सकाळी ७ वाजता शेतात गेल्यानंतर त्यांना बैलजोडी तिथे दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला, मात्र बैलजोडीचा थांगपत्ता लागला नाही. घटनेनंतर फुलकर यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, पेरणीच्या ऐन गर्दीच्या काळात अशा प्रकारे बैलजोडी चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.