नकली बांधकाम कामगार प्रकरण! दलालांविरोधात राज्यात विशेष तपासणी मोहीम; प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन होणार! कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय....
Jun 27, 2025, 09:25 IST
मुंबई : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील विविध भागांतील लोकप्रतिनिधी आणि कामगारांकडून सरकारकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रियेत गैरव्यवहार, कामगारांना देण्यात येणाऱ्या कीट वाटपात गडबड, आणि विविध योजनांच्या लाभातून दलालांकडून होणारी फसवणूक यावर आळा घालण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षता पथके स्थापन केली जाणार आहेत. ही पथके बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाची बारकाईने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करतील.
विशेष तपासणी मोहिमेचा पहिला टप्पा १० जुलै २०२५ अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्हास्तरावर मोहीम राबवून कामगारांच्या हक्कांचे संरक्षण व भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कामगार कल्याणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, ही मोहीम गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.