EXCLUSIVE केसांनंतर आता नखांचीही गळती! शेगाव तालुक्यात अनामिक आजाराने खळबळ...

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेगाव तालुक्यात सुरू असलेल्या विचित्र केस गळतीच्या आजाराने अद्याप पूर्णतः समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. त्यातच आता आणखी एक नवीन आणि धक्कादायक लक्षण समोर आलं आहे. तालुक्यातील बोंडगाव या गावात आता हातांची नखे गळून पडण्याच्या घटना घडू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरुवातीपासून शेगाव, खामगाव आणि नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केस गळती व टक्कल पडण्याचे रुग्ण आढळून आले. या रुग्णांची संख्या ३५० च्या घरात असून, अद्याप केंद्र सरकारच्या आरोग्य संस्थेकडून अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या आजाराच्या निदानाबाबत आणि उपचाराबाबत गोंधळ कायम आहे.आता याच आजाराने ग्रस्त बोंडगावात काही गावकऱ्यांच्या बोटांची नखे गळून पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आधीच मानसिकदृष्ट्या तणावात असलेल्या नागरिकांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. परिसरातील इतर गावांमधूनही अशीच लक्षणं दिसू लागल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
आरोग्य विभागाची तातडीची हालचाल
  या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक बोंडगावात दाखल झाले आहे. पथकाने प्रथम शेगाव तालुका आरोग्य कार्यालयाची भेट घेऊन तक्रारींची माहिती घेतली. सध्या पाच ते सहा लोकांमध्ये नख गळतीचे लक्षणं आढळल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
पथक गावात तपासणी करून पुढील निदानासाठी नमुने गोळा करत आहे.
उपचार, कारण आणि अहवाल यांची प्रतीक्षा
या संपूर्ण प्रकरणावर अजूनही ठोस निदान, स्पष्ट कारण वा खात्रीशीर उपाय उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये भीती व संशयाचे वातावरण आहे. केंद्रीय आरोग्य संस्थेच्या अहवालाची प्रतीक्षा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आणि नागरिकांना लागली आहे.