गोठ्यातून मायच पळवली! २०-२५ किमी जीवावरचा पाठलाग; खामगाव ग्रामीण पोलिसांनी गाय वाचवली, चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार!

 रात्रीच्या काळोखात कारमध्ये कोंबून गाय चोरीचा प्रयत्न; पोलिसांच्या धाडसी कारवाईने उधळला डाव....

 
 खामगाव (भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांसाठी गाय म्हणजे केवळ जनावर नसते, तर ती कुटुंबातील एक सदस्य असते. अशाच एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून रात्रीच्या अंधारात गाय चोरून कारमध्ये कोंबून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा खामगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल २० ते २५ किलोमीटर जीवावरचा थरारक पाठलाग करत डाव उधळून लावला. पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे ३५ हजार रुपये किमतीची गाय सुखरूप वाचली, मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरी अडगाव (ता. खामगाव) येथील बाळासाहेब रामराव टीकार (वय ४६) यांच्या मालकीच्या पाच गायी गावातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील गोठ्यात बांधलेल्या होत्या. ५ ऑगस्टच्या रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे गायी गोठ्यात बांधून घरी झोप घेतली. मात्र मध्यरात्रीनंतर रात्री ११ ते पहाटे ३.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात घुसून १० वर्षे वयाची पांढऱ्या बाहाळी रंगाची गाय जबरदस्तीने टाटा कार (MH-31 FC-1788) मध्ये कोंबली आणि भरधाव वेगाने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कारवाई सुरू केली. चालक कैलास हटकर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष रिंढे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बोरी अडगाव ते वाडेगावदरम्यान चोरट्यांच्या कारचा २० ते २५ किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला. पोलिसांची गाडी मागावर असल्याचे लक्षात येताच चोरट्यांची धावपळ उडाली.
अखेर पोलिसांनी संशयित कारला गाठून ताब्यात घेतले. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरटे घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. कारची झडती घेतली असता, आतमध्ये निर्दयपणे कोंबलेली ३५ हजार रुपये किमतीची गाय सुखरूप अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तातडीने गायीची सुटका करून ती ताब्यात घेतली, तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली टाटा कार जप्त केली.

या प्रकरणी बाळासाहेब टीकार यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार किरण राऊत यांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळकृष्ण फुंडकर हे फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.गोरक्षणाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांच्या काळात गायीच गोठ्यातून चोरून नेण्याचे धाडस करणाऱ्या टोळ्यांनी आता ग्रामीण भागालाच लक्ष्य केल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अशा चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून, दुसरीकडे खामगाव ग्रामीण पोलिसांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद ठरत आहे.