पुलाचे बांधकाम रखडले; लासुरा–जहांगीर ग्रामस्थ येणाऱ्या निवडणुकीवर घालणार बहिष्कार!

 
 खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील संभापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या लासुरा–जहांगीर गावातील ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारणदेखील तितकेच गंभीर असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उमरा–लासुरा गावदरम्यान असलेल्या मस नदीवर पुलाचं बांधकाम न झाल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना, रुग्णांना तसेच शेतकऱ्यांना येण्या–जाण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. निवडणुकीच्या काळात अनेक लोकप्रतिनिधी गावाला भेट देऊन आश्वासने देतात; मात्र आजपर्यंत कोणीही ती पूर्ण केलेली नाहीत.
या सततच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे. त्याविषयी २७ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा निवडणूक अधिकारी, खामगाव यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी गजानन गावंडे, चिंतामण शेगोकार, कोमल शेगोकार, दीपक शेगोकार, निखिल शेलारकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.