मलकापूर पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन...! स्विफ्ट कार पकडली, आत सापडला माल...

 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी गुटखा व सुगंधित पानमसाल्याची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या कारमधून १ लाख ६२ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, वाहनासह एकूण ८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात गेला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विठ्ठल संजय लाटे, रा. कोथळी ता. मोताळा आणि नागेश सोपान गावंडे, रा. निपाणी ता. खामगाव जि. बुलडाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कुऱ्हा येथून मलकापूरकडे येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली. यावेळी कारच्या डिक्कीत गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचे पॅकेट्स आढळून आले. त्याची एकूण किंमत १ लाख ६२ हजार ७३४ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. कारसह एकूण मुद्देमालाची किंमत ८ लाख ६२ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पोलीस उपनिरीक्षक बावस्कर, स.फौ. टेकाडे, पो.हे.कॉ. वैदकर यांनी केली.