मिरवणुकीत पोलिसांशी हुज्जत; १० ते १२ जणांवर गुन्हा आदेशाचे उल्लंघन करून धक्काबुक्की अन् शासकीय कामात अडथळा; खामगाव पोलिसांची कारवाई

 
 खामगाव : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करत दुसऱ्या मार्गाने मिरवणूक नेणे, हुल्लडबाजी करणे तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास युवराज फॅशन दुकानासमोर स्कुटीच्या धक्क्यावरून वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. यावेळी आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून मिरवणूक दुसऱ्या मार्गाने नेणे, हुल्लडबाजी करणे तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्की केल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. या प्रकारामुळे पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी अक्षय परदेशी (वय ३०), तुषार चंदेल (वय ३५), विक्की पवार (वय ३०), वरुण ऊर्फ मॉन्टी परदेशी (वय २४), विशाल चंदेल (वय ३०) यांच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मपोका कलम १३५ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे करीत आहेत.पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर आता खामगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.