खामगावात वासराची शिकार!; वाघोबाचा पाहुणचार?; शहर सोडून गेल्याची चर्चा असतानाच अचानक 'मी पुन्हा येईन'!
खामगाव शहरातील गाडगेबाबा नगरातील महाकाल चौक परिसरातील प्रा. राजपूत यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाघाचा वावर ४ डिसेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास कैद झाला होता. त्यानंतर शोध घेऊनही वाघाच्या अस्तित्वाचा दुसरा पुरावा समोर आला नव्हता. मात्र त्याच दिवशी सायंकाळी मढी डीपी परिसरातील बुंदेले यांच्या शेतात एका झाडाखाली वाघ दिसला होता. त्यानंतर वनविभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. सुटाळपुरा, सिंधी कॉलनी, सिव्हिल लाईन, महाकाल चौक, डीपी रोड, फरशी, लायन्स ज्ञानपीठ भागात वाघाचा शोध सुरू करण्यात आला होता.
मात्र वाघ दृष्टीस पडत नव्हता. काल, ६ डिसेंबर रोजी सुद्धा दिवसभर शोध घेऊनही वाघ सापडला नसल्याने तो शहराबाहेर गेला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आज गोरक्षण रोड भागातील गायीच्या बछड्याला ठार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर वाघाचा वावर शहर परिसरातच असल्याचे बोलले जात आहे. वनविभाग, अमरावतीहून आलेले तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ही हत्या वाघानेच केली की अन्य दुसऱ्या प्राण्याने याबाबत ते शोध घेत आहेत. वनविभागाच्या मदतीला खामगाव शहर पोलीस, शिवाजीनगर पोलीस, खामगाव ग्रामीण पोलीस सुद्धा वाघोबाचा शोध घेत असून, परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.