एसटी कर्मचाऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र या संपावर अजूनही तोडगा निघत नसल्याने खामगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना काल, १६ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास माटरगाव (ता. शेगाव) येथे समोर आली.
माटरगाव येथील विशाल प्रकाश अंबलकार (३२) हा युवक खामगाव आगारात यांत्रिकी विभागात सहायक पदावर कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने तोसुद्धा या संपात सहभागी होता. जिल्ह्यात अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. या संपाचे पुढे काय होईल? कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील का? या विवंचनेत विशालने काल रात्री नऊच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब नातेवाइकांना कळताच त्यांनी तात्काळ त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच खामगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत एसटी कर्मचारी बांधवांनी खामगाव रुग्णालयातच ठिय्या मांडला होता.