वानखेड ग्रामपंचायतीत मनमानी कारभार , ग्रामसेवक सदा गैरहजर! गावकरी म्हणतात उचलबांगडी करा राव....
Jul 23, 2024, 20:58 IST
संग्रामपूर (स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील वानखेड ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार सुरू असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नागरिकांना ग्रामसेवक वेळेत हजर राहत नसल्याने विविध दाखल्यांसाठी दहा वेळा खेटे घालावे लागत आहेत. येथील ग्रामसेवकांची दिवसेंदिवस मुजोरगिरी वाढली असून त्याचा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे करून टाका ग्रामसेवकाची बदली अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
वानखेड येथील ग्रामसेवक सरकारी कामापेक्षा खाजगी कामातच दंग असल्याने ग्रामस्थांना विविध कामासाठी खोळंबून राहावे लागत असल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.वानखेड या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वानखेड ग्रामपंचायतमध्ये शैक्षणिक व इतर कामाकरीता लागणारे दाखले,बांधकाम कामगारांना दाखला देण्यात टाळाटाळ करणे, सामान्यांना वेठीस धरणे अशा अनेक समस्या गावात दिवसेंदिवस वाढत आहे.
गावातील नागरिक जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येतात तेव्हा त्यांना कळते की ग्रामसेवक येणारच नाहीत. ग्रामसेवकांना फोन लावून तुम्ही कार्यालयात केव्हा येणार, असे विचारले असता मला एकच काम आहे का ? माझ्याकडे दुसरे काम नाही का? कधी पंचायत समिती तर कधी जिल्हा परिषदेला जायचे आहे किंवा मिटींग आहे असे सांगून वेळ मारुन नेतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरीता दाखल्यांची गरज पडत असल्याने ग्रामसेवक महाशय हजर नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्याच बरोबर गावातील काही लोकांना घरकुल मंजूर झाले आहे. त्यातील पहिला,दुसरा टप्पा मिळवण्यासाठी ग्रामसेवकांसमोर पायघड्या घालाव्या लागत आहेत.
महत्वाची बाब म्हणजे शासन नियमानुसार ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे गरजेचे असतांना ग्रामसेवक मुख्यालयात तर सोडा ग्रामपंचायतीत वेळेत उपस्थित राहण्याचीही तसदी घेत नाहीत अशा अनेक तक्रारींचा पाढा गावातील नागरिक आता बीडीओ आणि सीईओ यांच्याकडे करणार असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.
दुसऱ्याला नियम, स्वतःमात्र सदा अनियमित….
वानखेड ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक एम. एन.बोडके कार्यरत असून रुजू झाल्यापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहे. ते नेहमी नियमानुसार काम केले जाईल आणि नियम सोडून कोणतेही काम होणार नाही,या वेळीच या, असेच करा ,तसे करु नका,मी नेहमी नियमानुसार दाखला देणार अशा नेहमी बाता मारत असतात पण स्वतः मात्र शासकीय नियमांची पायमल्ली करत असल्याचे पहावयास मिळत आहे. ग्रामसेवकांकडून होत असलेल्या या वर्तनामुळे गावातील सर्व नागरिक त्रस्त असून त्यांची लवकरात लवकर बदली करावी अशी मागणी सामान्यांतुन होत आहे.