शेगाव बस स्थानकावर वृद्ध महिलेची सोन्याची पोत चोरली, २४ वर्षीय महिला रंगेहाथ पकडली..!

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या महिलेला शेगाव शहर पोलिसांनी बस स्थानकावरच रंगेहाथ पकडले. जप्त केलेल्या पोतीची किंमत अंदाजे ४५ हजार रुपये आहे.

११ जून  रोजी सावरगाव, ता. चिखली येथील अनुसया सखाराम डुकरे पाटील (वय ७०) या गावातील इतर महिलांसोबत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला आल्या होत्या. सकाळी ९:३० वा. दर्शन घेऊन फराळ करून त्या परतीसाठी शेगाव बस स्थानकावर आल्या. 

दुपारी १२:३० वा. संभाजीनगर बस फलाटावर लागली असता, बसमध्ये चढताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात महिलेने अनुसया पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत - ज्यात सोन्याचे व काळे मणी आणि एक पदक होते - हिसकावून तोडली व गर्दीत बस मध्ये चढली.

वृद्ध महिलेने लगेच कंडक्टरला प्रकार सांगितला. कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत बस थेट शेगाव शहर पोलीस स्टेशनला नेली. तिथे महिला पोलिसांच्या मदतीने बसमधील महिलांची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान सपना उर्फ कीर्ती रोहित गायकवाड (वय २४, रा. भोनगाव, ता. संग्रामपूर) हिच्याकडून अनुसया पाटील यांची ३ ग्रॅम वजनाची, ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत मिळून आली. पोलिसांनी पंचनामा करून ऐवज जप्त केला. अनुसया पाटील यांच्या तक्रारीवरून सपना गायकवाड विरोधात शेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. श्याम आघाव हे करत आहेत.