भीषण अपघात ! गणेश विसर्जन करून परतणाऱ्या मालवाहक गाडीला ट्रकची धडक;एक गंभीर ! संतप्त नागरिकांनी ट्रकच जाळला ; खामगावची घटना

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मालवाहक (छोटा हत्ती) गाडीला ट्रकची धडक लागलेल्याने संतप्त नागरिकांनी ट्रक जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना आज २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. 
खामगाव शहरातील जनुना बायपास चौफुल्ली जवळ सदरची घटना घडली असून झाले असे ,की जनुना तलाव येथून छोटाहत्ती मालवाहक गाडीत २६ सप्टेंबर च्या रात्री १२ वाजता काही गणेश भक्त बाप्पाचे विसर्जन करून खामगाव शहराच्या दिशेने येत होते. यातच भरधाव ट्रकने छोटाहत्ती मालवाहक गाडीला जनुना बायपास चौफुल्ली जवळ जोरदार धडक दिली. यामध्ये एकूण ५ जण जखमी झाले आहेत. एक जण गंभीर आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला आहे. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाची गाडी बोलावून आग विझवली आहे. वृत्त लिहे पर्यंत पोलीस कारवाई चालू होती.