वानखेड -दुर्गादैत्य पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार;
अर्धवट काम सोडून ठेकेदार झाला गायब...
Aug 22, 2024, 09:09 IST
संग्रामपूर( स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातून जाणाऱ्या वानखेड- दुर्गादैत्य- या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वानखेड-दुर्गादैत्य येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नाल्यावर वरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
शाळा, कॉलेज व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने पुलाच्या कामाची दुर्दशा केली आहे.
रात्रीच्या वेळेस स्थानिक नागरिकांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे.पुलाच्या कॉंक्रिटीकरणासाठी टाकण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांमधूनच अनेक शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्तावले?
पुलाच्या च्या दुरवस्थेला जबाबदार असताना
या ठेकेदारावर मेहेरबान होण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने होत असल्याने याचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना होत आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल अधिकारी घेत नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या पुलाच्या कामाच्या पूर्णत्वाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे.
नागरिक म्हणतात...
कोट्यवधी रुपये खर्च करूनही वानखेड -दुर्गादैत्य रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट आहे. खड्डे, दगड-मातीत खचलेल्या पुलावरून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे या पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार कायम असल्याचे गोपाल सांगळे म्हणतात...
सुदैवाने दुर्घटना घडल्या नाहीत, असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम पूर्ण केले नाही. ओढ्यात सिमेंट काँक्रीटचे स्लॅब उभे करून पूल उभारण्यात आला आहे.
मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती, कठडे, भराव टाकून पुलावर डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. पुलाचे काम करणार्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे नागरिकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण? संबंधित ठेकेदाराने जाण्या येण्याकरिता मार्ग काढून दिला होता मात्र पाणी आल्यामुळे तो मार्ग पाण्यामध्ये वाहून गेला अशी प्रतिक्रिया वानखेड येथील डॉ.उमेश अंबुसकार यांनी दिली.
वाहनधारक प्रमोद गव्हाळे म्हणतात...
वानखेड दुर्गादैत्य येथील नाल्या वरील पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. अर्धवट पुलाचे बांधकाम सध्या कित्येक दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अर्धवट आणि रखडलेल्या पुलाचा सांगा फायदा तरी काय? असा प्रश्न सध्या विद्यार्थी, शेतकरी, मजुर, कामगार आणि वाहनधारक विचारत आहेत.