गोठ्याला मध्यरात्री भीषण आग! २ लाखांचे शेती साहित्य खाक; तायडे कुटुंब अडचणीत; संग्रामपूर तालुक्यातील घटना...

 
 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – तालुक्यातील तामगाव येथील शेतकरी प्रकाश ज्ञानदेव तायडे यांच्या बोडखा शिवारातील गोठ्याला २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तायडे कुटुंबाचे अंदाजे २ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या आगीत गोठ्यात साठवलेले गुरांसाठीचे १२ ट्रॉली कुटार, स्प्रिंकलरसह पाईप, ताडपत्र्या, डाले आणि इतर शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.आग लागल्याचे समजताच तायडे कुटुंबीय आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
गोठ्याला चौफेर आग लागल्याने ती आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे जळगाव जा. येथून नगरपालिका अग्निशामक वाहन बोलविण्यात आले.फायरमन अनिल मिसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अखेर आग आटोक्यात आणली.  मात्र तोपर्यंत साठवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.
त्या घटनेमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तामगाव ग्रामस्थांनी शासनाकडे तायडे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.