खामगाव बसस्थानक परिसरात गांजा विक्रीचा डाव उधळला! चिखली तालुक्यातील दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या;

 तब्बल सहा किलो गांजासह ३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त; ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

 
 खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांच्या ताब्यातून ५ किलो ९४७ ग्रॅम गांजासह एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी चिखली तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी खामगाव बसस्थानक परिसरात काही व्यक्ती गांजा बाळगून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने बसस्थानक परिसरात पंचांसमक्ष छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. सचिन प्रभाकर थिगळे (वय ३५, रा. कटोडा, ता. चिखली) आणि शेख सलीम शेख रजाक (वय ३५, रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून २ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचा ५ किलो ९४७ ग्रॅम गांजा आणि २० हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील इंगळे यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थविरोधी (एनडीपीएस) कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा (क्रमांक ६३४/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगावचे अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. ‘मिशन परिवर्तन’च्या माध्यमातून जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.