याला म्हणतात प्रामाणिकपणा! रस्त्यात सापडलेली पाच लाख रुपयांची बॅग चक्क परत केली!!
 

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली तर काय होईल... अशी हरवलेली बॅग सापडण्याची किंवा पुन्हा मिळण्याची शक्यता कमीच... मात्र खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रूक येथील घोराडे परिवाराची सोन्याचे व चांदीचे दागिने असलेली हरवलेली बॅग पुन्हा त्‍यांना परत मिळाली आहे. अर्थात ज्यांना ती बॅग सापडली, त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत सापडलेली बॅग घोराडे परिवाराच्या स्वाधीन केली. खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील भजनी मंडळाच्या बबलू राठोड, संतोष इंगळे, महादेव काकड, गोलू इंगळे यांना ही बॅग सापडली होती.

त्याचे झाले असे, की हिवरा बुद्रूक येथील सहदेव घोराडे यांच्या मुलीचा विवाह २१ एप्रिलला पार पडला. २२ एप्रिलला खामगाव येथे स्वागत समारंभ झाला. त्यानंतर रात्री ते परिवारासह मॅक्झिमो गाडीने घरी हिवरा बुद्रूकला परतत असताना गाडीच्या टपावर ठेवलेली बॅग खाली पडली. बॅगमध्ये घोराडे यांच्या मुलीच्या लग्नातील काही कपडे, दागिने व रोख ९ हजार रुपये होते.

मध्यरात्री दीडच्या सुमारास खामगाव येथील तायडे कॉलनीतील गजानन सोळंके यांच्या घरी श्री गुरुदेव भजनाचा कार्यक्रम आटोपून घराकडे जात असलेल्या निमकवळा येथील बबलू राठोड, संतोष इंगळे, महादेव काकड, गोलू इंगळे यांना ती बॅग सापडली. त्यांनी ती बॅग घरी नेल्यानंतर उघडली असता त्यात सोन्याची पट्टा पोत, कानातले व रोख ९ हजार रुपये व काही मौल्यवान भेटवस्तू दिसल्या.

काही भेटवस्तूवर घोराडे यांच्या नावाचा उल्लेख असल्याने त्यांनी लगेच घोराडे परिवाराशी संपर्क करून बॅग सापडल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिवरा बुद्रूक येथील मारोती संस्थानमध्ये घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सापडलेली बॅग घारोडे यांच्या स्वाधीन करण्यात आली. घारोडे परिवाराने बबलू राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि आभार मानले. बबलू राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.