ठरल..! श्री संत गजानन महाराजांची पालखी "या" तारखेला करणार प्रस्थान; यंदाचे पायदळ वारीचे ५३ वे वर्ष!
May 20, 2022, 17:52 IST
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपुरसाठी जाणाऱ्या पायदळ वारीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात ६ जून रोजी श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी यात्रेसाठी प्रस्थान करणार आहे. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आज, २० मे रोजी ही माहिती देण्यात आली.
शेगाव येथून जाणाऱ्या पायदळ वारीचे यंदाचे ५३ वे वर्ष आहे. ६ जून रोजी सकाळी ७ वाजता श्रींच्या मंदिरातून पालखी प्रस्थान करणार आहे. अकोला , वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजिनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमीटरचा प्रवास करून ८ जुलै २०२२ रोजी पांडुरंगाच्या नगरीत पोहचनार आहे. ८ जुलै ते १२ जुलै पर्यंत पालखीचा पंढरपुरात मुक्काम राहणार असून १३ जुलै रोजी सकाळी काला झाल्यावर पालखी शेगाव करीता परतीच्या मार्गाने प्रस्थान करणार आहे.