धक्कादायक... दोन सख्ख्या भावांचे अपहरण; तीन महिन्यांत जिल्ह्यात अपहरणाचे अर्धशतक!
मुलांची आई काही दिवसांपासून माहेरी गेलेली असल्याने दोन्ही मुले वडील व आजी- आजोबांसोबत गावात राहत होते. मुलांचे वडील राजेंद्र रणसिंगे हे ३१ मार्च रोजी सुटाळा येथे मजुरीसाठी गेले होते. सकाळी आठला दोन्ही मुले शौचास जातो असे सांगून निघून गेली. मात्र बराच वेळ होऊन ती परतली नाही.
रात्री आठपर्यंत सुद्धा ती न परतल्याने मुलांच्या आजी- आजोबांनी व वडिलांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलाच्या वडिलांनी त्यांच्या सासरवाडीला जाऊन बघितले, मात्र मुले सापडली नाहीत. सगळीकडे शोध घेऊन मुले न सापडल्याने काल खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुलांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
वाढत्या अपहरणाच्या घटना चिंताजनक...
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अपहरणाच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नववर्षाच्या दोन महिन्यांत अपहरणाच्या ३१ घटना घडल्या होत्या. मार्च महिन्यात अपहरणाच्या घटनांनी अर्धशतक गाठले असून, तीन महिन्यांत अपहरणाच्या ५२ घटना समोर आल्या आहेत. वाढत्या अपहरणाच्या घटना पोलीस प्रशासनासोबत समाजासाठी सुद्धा चिंतेची बाब आहे.