धक्कादायक... ३४ मजुरांचा तोंडातला घास हिरावून पळून गेला ठेकेदार!

८ दिवस मरमर रस्त्याचे काम करून घेतले, पैसे देण्याची वेळ आली तर फोन बंद करून गायब!!; पिंपळगाव राजा पोलीस तक्रारही घेईनात, मजुरांनी "बुलडाणा लाइव्ह'कडे सांगितली आपबिती, चिखलीतील हरणीचा आहे हा ठेकेदार
 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भल्या पहाटे न्याहरी न करताच घराबाहेर पडून ३४ मजूर गावातल्याच बोलेरो पीकअपने जाफराबाद- चिखली रोडच्या कामावर जायचे. आधीच कोरोनामुळे हाताला काम नसल्याने मिळालेल्या कामाचा आनंद मानत मजूर मरमर राबले. आठ दिवसांनी कामाचे पैसे मिळतील, असे सांगण्यात आले होते. पण आठ दिवसांनी ठेकेदारच गायब झाला. त्‍याचे दोन्ही मोबाइल नंबरही लागत नाहीत. मजुरांनी गावातल्या ज्‍या व्यक्‍तीने त्‍या कामावर नेले होते, त्‍यालाच वेठीस धरले. पण तोच फसवला गेल्याने आणि त्‍याचीही घरची परिस्थिती ठीक नसल्याने ठेकेदाराच्या शोधात मजूर आहेत. त्‍यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्याचाही प्रयत्‍न केला. पण पोलिसांनी तक्रारही घेतली नसल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. आठ दिवस काम करूनही मजुरांना कामाचे पैसे मिळत नसतील आणि फसवणुकीची तक्रार पोलीसही घेत नसतील तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पहायचं, असे हताश उद्‌गार या मजुरांनी काढले आहेत. तब्‍बल ३४ मजुरांची ही कामाची रक्‍कम १ लाखापर्यंत जाते.

पहा व्हिडिओ..असे कामावर राबराब राबले मजूर...

फसवले गेलेले मजूर गिरोली (ता. मोताळा) येथील आहेत. गावातीलच एका व्यक्‍तीच्या माध्यमातून विलास चव्हाण (जय सेवालाल अर्थमुव्हर्स, हरणी, ता. चिखली) नावाच्या ठेकेदाराने त्‍यांना जाफराबाद- चिखली रोडच्या कामाला लावले होते. त्‍यांना ठेकेदाराने ४०० रुपये रोज ठरवला होता. मजुरांची ने आण करण्यासाठी गावातीलच बोलेरो पीकअप वाहनाचीही व्यवस्था केली होती. पहाटे पाचलाच मजूर उठून न्याहरी न करताच कामावर जाण्याची घाई करायचे. डबा घेतला की पीकअपने ८० ते ९० किलोमीटर अंतरावरील कामावर जायचे. घरी यायला त्यांना रात्रीचे नऊ- साडेनऊ व्हायचे.

मध्येच मजुरांची वाहतूक पीकअपने होत असल्याने वाहतूक पोलीस अडवायचे. त्‍यांना सर्व मजूर पोटासाठी मजुरीवर जात असल्याची कहानी ऐकवायचे आणि पोलीसही माणुसकी जपून त्‍यांचे वाहन सोडायचे. आठ दिवस अशा पद्धतीने मजुरांनी रोडचे काम केले. २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत काम चालले. आठ दिवसांनी मजुरीचे पैसे मिळतील, असे सांगण्यात आले होते. पैसे घेण्याच्या दिवशी मजुरांनी ठेकेदाराला संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला तर त्‍याचे दोन्ही नंबर बंद येऊ लागले. ज्‍याने कामाला नेले आणि कामाची पाहणी करण्यासाठी जो सुपरवायझर येत होता. तेही मजुरीच्या पैशांबद्दल काहीच सांगू शकत नव्हते. त्‍यामुळे मजूर हवालदील झाले.

हा व्हिडिओ पाहिला की तुमच्या लक्षात येईल की घरच्या भाकरी खा अन्‌ मामा बकऱ्या वळा ही म्‍हण का तयार झाली असेल...

गेल्या दहा दिवसांपासून ते मजुरीच्या पैशांसाठी रोज ठेकेदाराला कॉल लावून पाहतात पण त्‍याचे दोन्ही नंबर लागत नाही. आज बुलडाणा लाइव्हनेही ते नंबर लावून पाहिले पण दोन्ही बंद आले. फसवणुकीची तक्रार करण्यासाठी मजूर पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा त्‍यांची तक्रार घेण्यात आली नाही. हे प्रकरण आमच्या अखत्यारित येत नाही, असे त्‍यांना सांगण्यात आले. पण फसवणूक झाल्याची तक्रार त्‍यांनी घ्यायला पाहिजे होती आणि ठेकेदाराला शोधायला हवे, असे मजुरांचे म्‍हणणे आहे. पोलीस या प्रकरणात तक्रार घ्यायलाही का नकार देत आहेत, हेही संशयच निर्माण करणारे आहे.

सध्या मजुरांच्या हाताला काम नाही. त्‍यातच राबूनही त्‍याचा मोबदला न मिळाल्याने ते चिंतित आहेत. विलास अर्जुन राठोड, सुनील पवार, जयराम राठोड, किरण आडे, विशाल राठोड, अतुल येरवाळ, सुभाष येरवाळ, बबन भाबरदोडे, अर्जुन भाबरदोडे, पवन राठोड, विनोद राठोड, दिलीप राठोड, अजय नाईक, ज्ञानेश्वर आडे, यशवंत चव्हाण, रोहिदास चव्हाण, चंदन गोरे, अशोक चव्हाण, रामा चव्हाण, नाविदास चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, भुरलाल चव्हाण, भाईदास चव्हाण, संदीप राठोड, कांतिलाल राठोड, महादेव सपकाळ, प्रेमदास चव्हाण, लक्ष्मण आडे, संदेश राठोड, सुरेश राठोड, अनिल राठोड, राहुल चव्हाण, संजय राठोड, तुकाराम राठोड असे फसवले गेलेल्या मजुरांची नावे आहेत.