Shocking! का करताहेत बुलडाणेकर आत्मघात??; दोन दिवसांतील पाचवी आत्महत्या!! शेगावमध्ये आता  मजुराने गळफास घेतला...

 
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ४५ वर्षीय मजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेगाव तालुक्यातील मच्छिंद्रखेड येथे आज, २९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. ज्ञानेश्वर दयाराम भारंबे ( रा. मच्छिंद्रखेड, ता. शेगाव) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. जिल्ह्यात गेल्या २ दिवसांत ५ आत्महत्येच्या घटना समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर भारंबे हे खासगी इलेक्ट्रिशियन म्हणून मजुरी काम करत होते. ते दारूच्या आहारी गेलेले होते. काल संध्याकाळी ते दारू पिऊन घरी आल्यानंतर घरात  झोपले होते तर पत्नी आणि मुले बाहेर अंगणात झोपले होते.

पहाटे ५ वाजता ज्ञानेश्वर भारंबे यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून बघितला असता  त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसले. टिनाखाली लावलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

ज्ञानेश्वर भारंबे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे. मृतकाचे चुलत भाऊ भागवत वसंता भारंबे ( २८, मच्छिंद्रखेड) यांच्या तक्रारीवरून जलंब पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस अंमलदार मुबिन शहा करीत आहेत.

जिल्ह्यात दोन दिवसांत ५ आत्महत्या
जिल्ह्यात २८ मार्च आणि २९ मार्च या दोनच दिवसांत ५ आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. काल, २८ मार्च रोजी नांदुरा तालुक्यातील पोटळी येथील शुभम देविदास सपकाळ (२०) या तरुणाने आत्महत्या केली. पत्नी आणि सासरचे फारकतीसाठी दबाव टाकतात म्हणून मोताळा तालुक्यातील धामणगाव बढेच्या संतोष देविदास अधिकार (३८) याने गळफास घेतला.

नांदुरा शहरातील  भीमनगरातील सागर अशोक वानखेडे याने काल झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुलडाणा शहरातील सागवन भागात राहणाऱ्या  अरुण उत्तमराव थोरात (३८)  याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, २९ मार्च रोजी सकाळी शेगाव तालुक्यातील मच्छिंद्रखेड येथील ज्ञानेश्वर दयाराम भारंबे (४५) या मजुराने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.