SUCCESS STORYखामगावातील चिंचपुरच्या शारदाने "एमपीएससी"त पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश! वाचा कसा केला अभ्यासाचा प्लॅन; बुलडाणा लाइव्ह ला सांगितले यशाचे सिक्रेट! म्हणाली, दुनिया की कोई ताकद... 

 
खामगाव( भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "मनाशी पक्के ठरवले आणि त्या ध्येयासाठी प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली की यश मिळवण्यापासून दुनिया की कोई भी ताकद तुम्हे रोक नही सकती..! आवश्यकता आहे फक्त सातत्याने मेहनत घेण्याची..! हे शब्द आहेत खामगाव तालुक्यातील चिंचपूरच्या शारदाचे.. शारदा कैलासआप्पा सरजने हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले असून आयोगाने जाहीर केल्यानुसार ती आता शिक्षणाधिकारी होणार आहे. खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली चींचपूरची लेक शिक्षणाधिकारी होणार असल्याने चिंचपूरच्या प्रत्येकाची छाती अभिमानाने फुगली आहे. विशेष म्हणजे घरी राहूनच शारदाने अभ्यास केला असून पुण्या मुंबईत न जाता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवता येते हेच तिने दाखवून दिले आहे. बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना तिने तिच्या यशाचे सिक्रेट सांगितले आहे.

शारदाचे वडील गावातच पोस्टमन असून आई गृहिणी आहे. चिंचपूर  येथील मराठी पूर्व प्राथमिक शाळेत तिचे पहिले ते पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या शारदाने कोणतेही क्लास न लावता नवोदयच्या परीक्षेत यश मिळवले. त्यामुळे ६ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण शेगाव येथील नवोदय विद्यालयात व्हायचे. त्यानंतर पदवीचे शिक्षण तिने पुण्यातील आयसर कॉलेज मधून पूर्ण केले. डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे असे लहानपणी ठेवणाऱ्या शारदाला पदवीचे शिक्षण घेत असताना समाजसेवेची ओढ लागली. आणि त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे तिने ठरवले. 

 दरम्यान एम.एस.सी पर्यंचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हातात काहीतरी उत्पन्नाचे साधन असावे म्हणून  तिने अर्ज भरलेल्या ब्रांच पोस्ट मास्तर  च्या परीक्षेत तिला यश मिळाले. ग्रामीण स्तरावर वाशिम जिल्ह्यातील केनवड या गावात तिची पोस्ट मास्तर शारदाची नियुक्ती झाली. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शारदा केनवड गावात पोस्ट मास्तरची नोकरी करत होती. सकाळी ८ ते १२ पर्यंत नोकरी करायची आणि त्यानंतर वेळ मिळेल तसा किमान ७ ते ८ तास अभ्यास करायचा असा नियम शारदाने स्वतःला घालून दिला. घरच्या घरीच ऑनलाईन क्लास तिने लावला. यासोबतच तिच्या गावाशेजारी असलेल्या फत्तेपूरचे  व नुकतेच एमपीएससी तून महिला व बालविकास अधिकारी झालेले नारायण टरे यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केल्याचे तिने सांगितले.  कितीही अडचणी आल्या तरी अभ्यासात सातत्य मात्र तिने कायम ठेवले. अभ्यास केलाच नाही असा दिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना तिच्या आयुष्यात आलाच नाही. अभ्यास करीत असताना तिला आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका मार्गदर्शक ठरल्या .
  
फेसबुक, व्हाट्सअप वापरणे बंद...
 

दरम्यान अभ्यास करीत असताना शारदाने सोशल मीडिया वापरणे बंद केले होते. फेसबुक व्हाट्सअप याचा वापर तिने केला नाही. फक्त स्पर्धा परीक्षेची माहिती मिळविण्यासाठी ती इंटरनेटचा वापर करीत होती. अभ्यासाच्या सोयीसाठी ती फक्त टेलिग्राम वापरत होती. अभ्यासासाठी मोबाईल आणि इंटरनेटचा बराच फायदा झाल्याचे ती सांगते. मात्र केवळ टाईमपास म्हणून मोबाईल वापरत असाल तर ते बंद करा असेही तिने सांगितले.
  
म्हणून व्हायचे अधिकारी...

अधिकारी व्हायचे  कशासाठी असा प्रश्न शारदाला मुलाखतीच्या वेळेस विचारण्यात आला होता. त्यावेळेस  अधिकारी होण्याची संधी मिळाल्यास  त्या संधीचे सोने करून फक्त अधिकारी म्हणून न मिरवता समाजासाठी चांगल काम करायचे आहे असे उत्तर तिने दिले होते. शिक्षण क्षेत्रात महिलांना अजून जास्तीत जास्त कसे पुढे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते. ग्रामीण महिलांच्या महिला सबलीकरणासाठी काम करायचे असल्याचे ती सांगते. केवळ पैसा कमवण्यासाठी नोकरी नाही असेही ती सांगते..
  
क्लास न लावता होता येते अधिकारी...

 दरम्यान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यासाठी क्लास लावलाच पाहिजे असे आवश्यक नाही. कारण क्लास फक्त मार्गदर्शन करतो मात्र अभ्यास हा आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. अभ्यास करण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी हवी.. स्वतःला उत्साही ठेवणे सुद्धा तेवढेच गरजेचं असल्याचे ती सांगते. एक दिवस भरपूर अभ्यास अन् दुसऱ्या दिवशी काहीच नको असे व्हायला नको असेही ती सांगते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्यांनी किमान १२ वी पर्यंतच्या  बेसिकचा चांगला अभ्यास करावा.  आधीच्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग मार्गदर्शक म्हणून करावा. अभ्यासासाठी इंटरनेटचा योग्य वेळी योग्य तो वापर केलाच पाहिजे. मोबाईलला अभ्यासाचा मित्र बनवा शत्रू नाही असेही ती सांगते.
  
खचून जाऊ नका...

 परीक्षेत स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे अपयश मिळाले म्हणून खचून जाऊ नका. कठोर मेहनत केल्यास तुमच्यापासून तुमचे यश कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असे ती सांगते..शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळवून पदावर जाणे आणि पैसा कमावणे एवढाच नसावा.. दुर्दैवाने तुम्हाला परीक्षेत अपयश आलेच तरी तुम्ही परीक्षेची तयारी करतांना मिळवलेले ज्ञान चांगले जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरते असेही शारदा सांगते.