नांदुऱ्यात IPL सट्टेबाजारांवर LCB ची कारवाई!; दोघांना पकडले, तिसरा पळाला
काल, २४ एप्रिलच्या रात्री मुंबई इंडियन्स आणि लखनौ संघादरम्यान सामना सुरू होता. या सामन्यावर नांदुऱ्यात सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदुरा शहरातील मोहनसिंग पिंपरे याच्या खासगी कार्यालयात रात्री १० च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला.
मोहनसिंग ओमसिंग पिंपरे (५०, रा. आठवडी बाजार रोड नांदुरा) व घनश्याम ज्ञानदेव डंबलकर (३२, रा. शिवाजी चौक, नांदुरा) या दोघांना रंगेहात पकडले. पथक आल्याची कुणकुण लागल्याने एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. पकडलेल्या आरोपींकडून १ लाख २४ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोहेकाँ गणेश किनगे, नापोकाँ गणेश पाटील, नापोकाँ राजू आडवे, पोकाँ केदार फाळके, पोकाँ राहुल बोर्डे यांनी पार पाडली.