मुख्याध्यापकाचा शिक्षिकेवर बलात्कार! खामगाव तालुक्यातील खळबळजनक घटना
Updated: May 1, 2022, 07:42 IST
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी काल, २९ एप्रिल रोजी संशयित मुख्याध्यापक श्रीकांत वानखेडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मुख्याध्यापक खामगाव तालुक्यातील हिंगणा येथील जिल्हा परिषद शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक आहे.
खामगाव तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असणाऱ्या महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने तिला घरी बोलावले. त्यानंतर दार बंद करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिक्षिकेने नकार दिला असता त्याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याने पीडित शिक्षिकेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढले व ते फोटो व्हायरल करून नवऱ्याला दाखविण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मुख्याध्यापक श्रीकांत वानखेडे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.