शेतकऱ्यांनो पावसाळा तोंडावर आलाय! जीव वाचवण्यासाठी "हे" कराच..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाळा सुरू झाल्यावर सुरुवातीच्या जून आणि जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी होण्याचा घटना घडत असतात. मात्र वीज पडून जीवित हानी होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने यासाठी एक "दामिनी" नावाचे ॲप तयार केले असून हे ॲप वीज पडण्याची पूर्वसूचना देणार आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी हे ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप जीपीएस लोकेशन नुसार काम करते. त्यामुळे एखाद्या भागात वीज कोसळणार असेल तर त्याआधी १५ मिनिटे पूर्वसूचना मिळते. त्यामुळे पूर्वसूचना मिळाल्यावर आपण सुरक्षित स्थळी जावू शकतो. गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानुसार आवश्यक त्या सूचना नागरिकांना द्यावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे.