खळबळजनक ब्रेकिंग! खामगाव तालुक्यातील पारखेडच्या स्मशानभूमीत मध्यरात्री मांडली अघोरी पूजा! निंबात सुया टोचल्या,तांदूळ अन् हळद कुंकू फेकले, रांगोळी काढली! गावात भीतीचे वातावरण! काळ्या जादूचा संशय!

 
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पारखेड (एमआयडीसी) वासियांसाठी आज, १४ ऑगस्टची सकाळ प्रचंड भितीदायक ठरली. गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री कुणीतरी अज्ञात लोकांनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी गावातील काही महिलांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खामगाव तालुक्यातील पारखेड च्या स्मशानभूमीत कुणीतरी अज्ञात लोकांनी ही अघोरी पूजा केली. स्मशानभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी निंबु ठेवले असून त्या निंबात सुया टोचल्या आहेत. याशिवाय निंबाच्या भोवती रांगोळीचे, तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले आहे.  काही धागेसुद्धा ठेवण्यात आले आहेत.

संपूर्ण स्मशानभूमीत २१ निंबाभोवती रिंगण करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा काळ्या जादूचा किंवा गुप्तधनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काहींच्या मते हा गुप्तधनासाठी बळी देण्याची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही अघोरी पूजा केली कुणी याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वृत्त लिहीस्तोवर खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते..