डॉ. जयश्री काटकर शेगावच्या नव्या मुख्याधिकारी !; वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीनंतर स्वीकारला पदभार
May 3, 2022, 08:06 IST
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव नगरपरिषदचे वादग्रस्त ठरलेले मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. जयश्री काटकर यांनी काल, २ मे रोजी पदभार स्वीकारला.
याआधीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. शेळकेंच्या बदलीसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांनी दंड थोपटले होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने प्रशासकीय स्तरावरून राज्यातील अनेक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी डॉ. प्रशांत शेळके यांची बदली झाल्याने शेगावातील अनेक राजकारण्यांना हायसे वाटले होते. डॉ .प्रशांत शेळकेंच्या जागी बदलून आलेल्या डॉ. जयश्री काटकर यांनी काल पदभार स्वीकारला. सध्या प्रशासकराज असल्याने त्यांच्याकडेच शेगावच्या विकासाची सूत्रे राहणार आहेत. शहरातील विविध नागरी समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान नव्या मुख्याधिकाऱ्यांस्मोर राहणार आहे.