ग्रामसेवकाच्या उंटावरून शेळ्या हाकलण्यामुळे रोहिणखेडवर पाणीटंचाईचे संकट!; महिनाभरापासून नळ योजना बंद, पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती!!; ग्रामसेवकाला बीडीओंचा आशीर्वाद?

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यालयी न राहणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे मोताळा तालुक्‍यातील रोहिणखेडमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील समस्यांशीही ग्रामविकास अधिकाऱ्याला काही देणेघेणे नसल्याचा आरोप करत ग्रामस्‍थांनी २१ फेब्रुवारीला त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून पाणीप्रश्नी निवेदन दिले.

ग्रामस्‍थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना या प्रश्नी निवेदन दिले आहे. निवेदनात म्‍हटले आहे, की नळ योजनेचे पाणी महिनाभरापासून बंद आहे. त्‍यामुळे गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहिणखेडला १४ गाव  योजनेतून नळगंगा धरणावरून पाणीपुरवठा होतो. मात्र बिल थकल्याने ही योजना बंद झाली आहे. ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्‍यामुळे गावातील समस्या त्‍यांना कळत नाहीत.

बुलडाण्यावरून येजा करतात. त्‍यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांचे आशीर्वाद आहेत. तातडीने नळ योजना सुरू करावी व या काळातील पाणीपट्टी माफ करावी. ७ दिवसांत नळाला पाणी आले नाही तर ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसू, असा इशाराही ग्रामस्‍थांनी निवेदनात दिला आहे. निवेदनावर डॉ. वैभव इंगळे, संजय वाघ, सुरेश सराग, इकबाल खान, सिद्दीक रऊफ, संतोष सोनोने, समाधान राजनकर, मोहम्मद इन्सार, वर्षा इंगळे, समीरा अंजुम, प्रकाश आपटे, पूनम जयस्वाल, योगेश लवंगे, रामदास दळवी, राजू सुरपाटणे, मंगलाबाई इंगळे, पल्लवी इंगळे, मो. वसीम टेलर, मो. आबीद मौलाना, प्रवीण गुजर यांच्यासह अन्य ग्रामस्‍थांच्या सह्या आहेत.