संग्रामपूर तालुक्‍यात दहशत पसरवणारे अस्वल अखेर जेरबंद!; अंबाबरवा अभारण्यात नेऊन सोडले!!

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांना भयभीत करून सोडणारे अस्वल अखेर वनविभाग आणि बुलडाण्याच्या रेस्क्यू पथकाने येऊन पकडले. पातुर्डा (ता. संग्रामपूर) शेतशिवारातील खेळमाळी शिवारात या अस्वलाने दहशत पसरवली होती. पातुर्डाच्या सीतामाता मंदिर परिसरातील पडीत शेतातील नाल्यात या अस्वलाला काल, १० फेब्रुवारीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
७ फेब्रुवारीला सर्वप्रथम या अस्वलाचे दर्शन झाले होते. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर वनपाल प्रमोद पाटील, वनकर्मचारी एस. पी. देवकर, पी. एच. चितोडे यांनी शोध मोहीम राबवली. गजानन धर्माळ यांच्या उसाच्या मळ्यात अस्वल दिले. काल बुलडाण्याहून रेस्क्यू पथक पातुर्डात बोलाविण्यात आले. शेतकरी रमेश दाभाडे, वासुदेव पारीसे यांनी अस्वल सीतामाता मंदिर परिसरात असल्याची माहिती दिली. त्‍यानंतर शोध मोहीम राबवून अस्वल ताब्‍यात घेण्यात आले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जी. शेंडे, डॉ. ए. ए. पटेल यांनी त्‍याची तपासणी केली. अस्वलाला अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी बीटमध्ये सोडण्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली.